मराठी मन ....!!
"ज्यांच्या उदरात आकार घेत मी या जगात आलो, ज्यांच्या प्रेमातूनच श्वासाला अर्थ मिळाला, ती माझी जन्मदात्री – आई... आणि ज्या भाषेत मी पहिल्यांदा 'आई' म्हणालो, जिच्या अंगाई गीतात , शब्दांत मला उब सापडली, ती माझी मातृभाषा – मराठी… या दोघींच्या ऋणात मी जन्मभर बांधलेलो आहे, कारण त्यांनीच मला जगायला आणि बोलायला शिकवलं… त्यांच्या चरणीच माझा हा छोटासा ब्लॉग, मनापासून समर्पि "आई आणि मातृभाषा – या दोन गोष्टींचं ऋण शब्दांनी फेडता येत नाही… पण हा छोटासा प्रयत्न त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी."
Wednesday, October 7, 2026
दादा… म्हणजे फक्त थोरला भाऊ नाही, तर वडिलांची सावली
आयुष्यात काही माणसं अशी असतात, की त्यांचं आपल्या आयुष्यातील स्थान शब्दांत मांडणं कठीण असतं. त्यांचं मोठेपण त्यांच्या पदात, पैशात किंवा मिळालेल्या पुरस्कारांत नसतं; तर **आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगी त्यांनी दिलेल्या आधारात असतं.
माझ्यासाठी असे व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे थोरले बंधू — **श्री. बाळासाहेब राजाराम माने… आमचे दादा.
दादा हे नातं आमच्यासाठी केवळ रक्ताचं नातं नाही.
ते आमच्यासाठी **आधार आहेत, मार्गदर्शक आहेत आणि अनेक प्रसंगी वडिलांची सावली आहेत.
कुटुंब असो, समाज असो किंवा शैक्षणिक क्षेत्र असो—दादांनी प्रत्येक जबाबदारी अत्यंत आत्मीयतेने स्वीकारली. काम कोणतेही असो, ते पूर्ण जबाबदारीने करायचे. वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर, दिलेला शब्द पाळणारे आणि एखादे काम हातात घेतले की ते पूर्णत्वाला नेण्यासाठी स्वतःला झोकून देणारे, हा त्यांचा स्वभाव.
पण दादांचं खरं मोठेपण आम्हाला जाणवतं ते त्यांच्या सामाजिक किंवा शैक्षणिक कार्यापेक्षा **आमच्या कुटुंबासाठी त्यांनी केलेल्या निःशब्द कष्टांतून.
आज आमच्या डोक्यावर जे छत आहे, त्यामागे दादांची मेहनत आहे.
आमच्या आयुष्यातील अनेक अडचणी त्यांनी स्वतःच्या समजून घेतल्या. आम्हाला आधाराची गरज असताना ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. आमच्या संसाराच्या वाटेवरही त्यांनी मोठ्या भावापेक्षा **वडिलांच्या मायेने आणि जबाबदारीने** आम्हाला साथ दिली.
काही वेळा मोठ्या भावाचे निर्णय कठोर वाटले असतील. एखादा शब्द मनाला लागला असेल. पण काळ पुढे गेला आणि अनुभव वाढला, तसं त्या प्रत्येक शब्दामागची काळजी समजू लागली.
त्या कठोरपणामागेही आपलेपणा होता,
त्या शिस्तीमागेही काळजी होती,
आणि त्या प्रत्येक मदतीमागे निःस्वार्थ प्रेम होतं.
थोरला भाऊ असणं ही केवळ जन्माने मिळालेली जबाबदारी नाही; ती आयुष्यभर निभावावी लागणारी भूमिका आहे. आणि दादांनी ही भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे निभावली.
आज त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत **दैनिक ‘पुढारी’ने ‘गुरुवर्य पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान केला**, ही बातमी वाचताना मनातला आनंद शब्दांत सांगता येत नाही.
हा पुरस्कार केवळ एका शिक्षकाचा सन्मान नाही.
हा विद्यार्थ्यांसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या एका शिक्षकाच्या कर्तृत्वाचा गौरव आहे.
हा आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलेल्या एका कर्तव्यनिष्ठ माणसाचा सन्मान आहे.
आणि आमच्यासाठी तर हा त्याहूनही मोठा आहे—
कुटुंबासाठी आयुष्यभर आधारवड बनून उभ्या राहिलेल्या आमच्या दादांचा हा सन्मान आहे.
दादांनी किती विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले, किती मुलांना योग्य दिशा दिली, किती जणांच्या मनात शिक्षणाची ज्योत पेटवली, याचा हिशेब कदाचित कुठल्याही पुरस्काराने करता येणार नाही.
कारण शिक्षकाचं खरं यश प्रमाणपत्रावर नसतं…
ते त्याच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दिसतं.
आणि मोठ्या भावाचं खरं मोठेपणही केवळ कौतुकाच्या शब्दांत नसतं…
**ते धाकट्या भावाच्या आयुष्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात असतं.
आज दादांचा सन्मान होताना आम्हा भावंडांच्या मनात अभिमानाबरोबरच कृतज्ञतेची भावनाही दाटून येते.
दादा,
तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं, त्याची परतफेड आम्ही कदाचित आयुष्यभर करू शकणार नाही.
पण एक गोष्ट मात्र मनापासून सांगावीशी वाटते—
तुम्ही आमचे थोरले भाऊ आहात, याचा आम्हाला अभिमान आहे;
पण त्याहून मोठं भाग्य म्हणजे आम्हाला तुमच्यासारखा दादा लाभला.
तुमच्या कष्टांना मिळालेला हा सन्मान पाहताना आज मन खरंच भरून आलं आहे.
*दैनिक ‘पुढारी’च्या ‘गुरुवर्य पुरस्काराने’ सन्मानित झाल्याबद्दल दादा, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!
तुमच्या कार्याची ही दखल आणखी अनेकांना प्रेरणा देवो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा तुम्ही असाच पेटवत राहा. समाजासाठी तुमचं योगदान असंच सुरू राहो.
आणि…
आमच्या डोक्यावर तुमची मायेची सावली अशीच कायम राहो.
तुमच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
दादा,
तुमचा भाऊ असल्याचा अभिमान आहे…
आणि तुमच्यासारखा दादा लाभला,
हे आमच्या आयुष्याचं भाग्य आहे! ❤️🙏
लेखकन : गजानन राजाराम माने.
Sunday, August 16, 2026
असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!
“असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!”
खऱ्या माणसांची नेहमी गळचेपी होते… त्यांचा आवाज नेहमीच दाबला जातो.
पण गंमत अशी आहे की, अनेकदा आपला आवाज दुसरा कोणी दाबत नाही… आपलेच लोक आपल्याला गप्प करतात.
परवा एक व्यक्ती छापील किंमत ३० रुपये असलेली पाण्याची बाटली मला ३५ रुपयांना देत होता.
मी विचारलं,
“यावर तर ३० रुपये किंमत आहे, मग ३५ रुपये कशाचे?”
उत्तर आलं,
“अहो, आम्ही ३५ लाच विकतो!”
माझ्या सोबतचे लोक म्हणाले,
“असू दे ना… पाच रुपयेच तर आहेत… त्यात काय एवढं?”
पण माझा प्रश्न पाच रुपयांचा नव्हता.
प्रश्न होता—३० रुपयांची वस्तू ३५ रुपयांना का?
तसंच दुसऱ्या ठिकाणी ४० रुपये किंमत असलेलं पेय ५० रुपयांना विकलं जात होतं.
मी विचारलं,
“हे ४० रुपयांचं आहे, मग ५० रुपये का?”
उत्तर आलं,
“अहो, सगळीकडे ५० लाच विकतात!”
पुन्हा तेच…
“असू दे…”
मी म्हटलं,
“ठीक आहे, ५० रुपये घ्या… पण पावती द्या.”
मग सुरू झाली उडवाउडवीची उत्तरं.
शेवटी माझ्याकडून ४० रुपयेच घेतले गेले.
पण मनात प्रश्न राहिला—
बाकीचे लोक का विचारत नाहीत?
शिकले-सवरलेले लोक, नोकरी करणारे लोक, समाजातील जबाबदार लोक… ते का गप्प बसतात?
कारण उत्तर तयार असतं—
“असू दे… सगळीकडे असंच चालतं!”
दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी काही टेस्ट सांगितल्या. त्यामध्ये ब्लड ग्रुपची टेस्टही होती.
मला माझा ब्लड ग्रुप आधीपासून माहीत होता. त्याचा जुना रिपोर्टही माझ्याकडे होता.
काउंटरवरून उत्तर आलं—
“जुना रिपोर्ट चालणार नाही, नवीन रिपोर्ट हवा.”
मनात लगेच प्रश्न आला—
अहो, माणसाचा ब्लड ग्रुप काही दिवसांनी बदलतो काय?
प्रश्न विचारला तर पुन्हा आजूबाजूचे म्हणाले,
“असू दे… त्याचे चार्जेसही फार नाहीत!”
अरे पण काय असू दे?
फक्त चार्ज कमी आहे म्हणून अनावश्यक गोष्ट योग्य ठरते का?
औषधांच्या दुकानात गेलो.
बिल होतं १३२५ रुपये.
वरचे २५ रुपये सुट्टे नसल्यामुळे दुकानदाराने दोन गोळ्या कमी दिल्या.
विनवणी केली तरी उत्तर—
“अहो, त्यात काय एवढं?”
पुन्हा तोच प्रश्न—
अहो, काय एवढं?
एखाद्या माणसाला पूर्ण औषधाची गरज आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार दुकानदाराला आहे का?
आपल्या समाजाची खरी अडचण फक्त चुकीची माणसं नाहीत.
चूक दिसत असूनही गप्प बसणारी मानसिकता ही त्याहून मोठी अडचण आहे.
“पाच रुपयेच तर आहेत…”
“दहा रुपयांसाठी कोण भांडणार?”
“वेळ नाही…”
“सगळीकडे असंच चालतं…”
“आपण एकटे काय बदलणार?”
याच विचारातून चुकीच्या गोष्टींना बळ मिळतं.
आज पाच रुपये आहेत.
उद्या पन्नास असतील.
परवा पाचशे असतील.
आज चुकीची पावती नाही.
उद्या मोठी फसवणूक असेल.
आज एखाद्याचे दोन रुपये वाचवले नाहीत.
उद्या एखाद्याचा मोठा हक्क हिरावला जाईल.
चूक छोटी आहे की मोठी, हा मुद्दा नाही.
चूक चूक आहे का, हा मुद्दा आहे.
प्रत्येक वेळी भांडण करायला हवे असे नाही.
प्रत्येक गोष्टीवर आवाज चढवायलाही नको.
पण जिथे प्रश्न विचारायला हवा, तिथे शांतपणे आणि ठामपणे “का?” विचारायला हवा.
“याची किंमत एवढी का?”
“पावती का नाही?”
“हा नियम कुठे आहे?”
“ही टेस्ट पुन्हा का?”
“औषध कमी का?”
हे प्रश्न विचारणे म्हणजे बंडखोरी नाही.
हे जागरूक नागरिक असण्याचे लक्षण आहे.
आणि हो…
प्रत्येक वेळी आपल्यासोबत कोणी उभं राहीलच असं नाही.
कधी कधी आपण एकटे असू.
आपल्या बाजूचेच लोक म्हणतील—
“सोड ना…”
“असू दे…”
“तुला काय फरक पडतो?”
पण आपण प्रत्येक वेळी इतरांच्या सोयीसाठी गप्प बसत गेलो तर आपल्या विवेकाचा आवाज हळूहळू मरतो.
पण हीच मानसिकता जेव्हा आपल्या नोकरी आणि हक्कांपर्यंत पोहोचते, तेव्हा प्रश्न फार मोठा होतो.
काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या PF, ESIC, इन्शुरन्स, बोनस, ओव्हरटाइम, रजा, ग्रॅच्युइटी अशा सुविधांबाबतही टाळाटाळ केली जाते किंवा त्यांचा योग्य लाभ मिळत नाही.
मग कर्मचारी विचारतो— “माझा हक्क कुठे आहे?” उत्तर मिळतं— “जेंव्हा विचारतील तेंव्हा पाहू…”
किंवा,
“जो विचारेल त्याला पाहू…”
आणि मग हक्कासाठी प्रश्न विचारणाऱ्या माणसाची अवस्था काय होते? त्याला वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्याला त्रास दिला जातो. “हा फार प्रश्न विचारतो…” “याला सगळं माहिती आहे असं वाटतं…” “कंपनीत राहायचं असेल तर जुळवून घ्यावं लागतं…”
अशी कुजबुज सुरू होते. म्हणजे हक्क मागणारा चुकीचा आणि हक्क न देणारा बरोबर?
ही कसली व्यवस्था?
आपण म्हणतो—
“शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातुड कशी!”
नुकसान सहन करणारा कर्मचारी...पण दोषही शेवटी त्याचाच! त्याने आवाज का उठवला? त्याने प्रश्न का विचारला? त्याने त्याचा हक्क का मागितला?
अरे…हक्क मागणे हा गुन्हा नाही.आणि हक्क देणे ही कोणाची कृपा नाही.कर्मचारी कंपनीसाठी आपला वेळ देतो.आपली मेहनत देतो.आपले कौशल्य देतो.आपल्या आयुष्यातील मौल्यवान वर्षे देतो.
त्याच्या बदल्यात त्याला जे कायदेशीर आणि करारानुसार मिळणे अपेक्षित आहे, ते मिळणे हा उपकार नाही—तो त्याचा हक्क आहे.
पण इथेही पुन्हा तोच प्रश्न— “आवाज कोण उठवणार?” कारण प्रत्येकाला नोकरीची गरज असते. प्रत्येकाला घर चालवायचे असते. मुलांचे शिक्षण असते. कर्ज असते.
जबाबदाऱ्या असतात. म्हणून अनेक जण अन्याय सहन करतात.
मनात म्हणतात— “असू दे… नोकरी तर टिकली पाहिजे.” आणि याच भीतीचा फायदा कुणी घेत असेल तर?
मग गप्प बसायचे का?
नाही!
पण आवाज उठवणे म्हणजे भांडणे नव्हे.
पुरावे ठेवणे, नियम समजून घेणे, योग्य व्यक्तीकडे प्रश्न मांडणे, लेखी उत्तर मागणे आणि गरज पडल्यास कायदेशीर मार्गाने तक्रार करणे—हा देखील आवाजच आहे.
आवाज ठाम असावा; उर्मट असण्याची गरज नाही. कारण समाजात बदल घडवणारे लोक नेहमीच बहुसंख्य असतात असे नाही.
कधी कधी एक माणूस “का?” विचारतो.
आणि त्याच्या त्या एका प्रश्नामुळे इतर शंभर माणसांना स्वतःचा हक्क आठवतो.
म्हणून मला एकच वाटतं—
“असू दे” म्हणण्यापूर्वी एकदा विचार करा…
नेमकं काय असू दे? किती असू दे? आणि किती काळ असू दे?
प्रत्येक अन्यायावर जगाशी भांडायचे नाही. पण अन्यायाला कायमची मान्यता देखील द्यायची नाही.
१५ ऑगस्टला आपण स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो.
२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो.
सोशल मीडियावर तिरंगा ठेवतो.
देशभक्तीच्या पोस्ट करतो.
पण देश म्हणजे फक्त तिरंगा नाही.
देश म्हणजे आपण.
आपल्या आजूबाजूला जगणारी माणसं.
त्यांचे हक्क.
त्यांचा सन्मान.
त्यांची सुरक्षितता.
आणि चुकीच्या गोष्टीविरुद्ध उभे राहण्याची आपली तयारी.
देशावर प्रेम करायचे असेल तर फक्त शुभेच्छा देऊन भागणार नाही.
कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या हक्कासाठी आवाज उठवावा लागेल.
कधी चुकीच्या व्यवहाराला “नाही” म्हणावे लागेल.
कधी पावती मागावी लागेल.
कधी नियम विचारावा लागेल.
आणि कधी आपल्या सोबतचे लोकच म्हणत असताना—
