Wednesday, March 2, 2011

कणा

ओळखलत का सर मला....पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत राहिली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले

कारभारनीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसता लढ म्हणा!!!
कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment

तुझी एक झलक, माझ्यासाठी ...

प्रिये... डोळे तुझे मदमस्त, गाल तुझे लाल, ओठांवरी मलई जशी चांदण्यांची शाल. नजरेत तुझ्या दडलेले घायाळ करणारे वार, एका कटाक्षाने...